यामी गौतमने “अ थर्स्टडे’ या थ्रिलर सिनेमाचे शुटिंग सुरू केले आहे. यामीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने क्लॅप बोर्ड दाखवला आहे आणि “अ थर्स्टडे’च्या कथेची थोडक्यात थीमदेखील सांगितली आहे.
या सिनेमात कधी न विसरता येणाऱ्या घटनांची एक मालिकाच असणार आहे, असे यामीने म्हटले आहे. या सिनेमाचे प्रॉडक्शन हाऊस असलेल्या आरव्हीएसपीनेही ट्विटरवरच्या पोस्टमध्ये या सिनेमाच्या शुटिंगबाबतची माहिती दिली आहे.
“अ थर्स्टडे’मध्ये यामी गौतम बरोबर डिंपल कापडिया, नेहा धुपिया, अतुल कुलकर्णी आणि माया सराव आदी कलाकार मंडळी असणार आहेत. यामीला या सिनेमात एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेचा रोल करायचा आहे.
यातील थ्रिल आणखी वाढवण्यासाठी कथेची माहिती इतक्यात देण्यात आलेली नाही. पण एक नक्की की या थ्रिलर सिनेमात यामीला प्रथमच थ्रिल अनुभवता येणार आहे. रॉनी स्क्रूवालाचे प्रॉडक्शन असलेल्या याच वर्षी रिलीज होणाऱ्या “अ थर्स्टडे’मध्ये आणखीही भरपूर थ्रिल असणार आहे. पण ते यथावकाश प्रेक्षकांना समजेल.