मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण राष्ट्रवादीच्या बंडानंतर पूर्णपणे बदलून गेले आहे. त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून अस्तित्वासाठी लढा देणे सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी अमरावतीमध्ये कार्यकर्तांची भेट घेतली. यावेळी राणा दांपत्याच्या कार्यकर्तांकडून उद्धव ठाकरे यांचे तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडूनही राणांचे बॅनर फाडण्याच्या घटना समोर आल्या. दरम्यान, या घटनेनंतर आता रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राणा दांपत्याच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कार्यक्रमाचे बॅनर फाडले गेले यावर बोलताना संजय राऊत यांनी ‘राणांनी आम्हाला गुंडगिरी शिकवू नये, असे म्हणत “याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. ते आज बॅनर फाडतायं कारण त्यांच्यामागे सत्ता आणि पोलिस आहे. ही गुंडगिरी झुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये.” असे फटकारले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याच्या वेळी राणा दांपत्याकडून हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र,तरीही राणा दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम आहे.यावर संजय राऊत म्हणाले की, “हनुमान चालिसाचं पठण त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा फुटलेला गट जो प्रखर हिंदूत्वाचा विरोध करत होता, त्यांच्या कार्यालयासमोर करावं. अमरावतीमध्ये त्यांना परत निवडणूका लढायच्या आहेत. या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही. त्यांना बजरंगबलीच धडा शिकवणार आहेत. हनुमानाच्या नावानं जी नौटंकी केली, त्यावर कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही धडा मिळेल.”
सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाचे बॅनर राणा समर्थकांनी फाडले. त्यानंतर ठाकरे समर्थकांकडूनही राणांच्या हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे बॅनर फाडण्यात आले होते. यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.