मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. बॉलीवूड चित्रपटांना अपयश मिळत असताना शाहरुखच्या ‘पठाण’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यानंतर आता शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. त्यापूर्वी ‘जवान’ या चित्रपटाचा प्रीव्हू व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वेळात या व्हिडिओ प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
‘जवान’च्या प्रीव्ह्यूमध्ये एकापेक्षा एक दमदार ॲक्शन सीन्स पहायला मिळत आहेत. फक्त शाहरुखच नाही तर नयनतारा आणि दीपिकासुद्धा अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सीन्सची सिनेमॅटोग्राफी विशेष लक्ष वेधून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये किंग खानचे चार वेगवेगळे लूक पहायला मिळतात. प्रीव्ह्यूची सुरुवातच शाहरुखच्या आवाजाने होते. दमदार अॅक्शन सीन्ससोबतच ‘बेकरार करके’ हे रेट्रो गाणंसुद्धा ऐकायला मिळते.
मात्र या चित्रपटात शाहरुखचा एक वेगळाच लुक पाहायला मिळत आहे. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. जवान प्रीव्हूमध्ये पहिल्यांदाच शाहरुखचा Bald Look दिसत आहे. मात्र त्याचा हा आगळावेगळा लुक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
‘जवान’ हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. ‘जवान’ सह शाहरुखच्या ‘डंकी’ या चित्रपटाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.