मुंबई : ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढणे आणि परत देण्याचा गोंधळ सकाळपासून सुरु आहे. मात्र नायडू यांच्यासह ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही बड्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक देखील हटवली आहे. यामुळे भारत सरकार आणि ट्विटरमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत.
ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटची ब्लू टिक काढण्याची चूक सुधारली आहे. आता त्यांच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या अनेक ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकली गेली आहे. यात कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार यांचा समावेश आहे.
यावर राजीव तुली यांनी ट्विट केले की, ट्विटर इंडियाने आरएसएस नेत्यांच्या हँडलमधून ब्ल्यू टिक हटवली आहे. यासाठी अद्याप कोणतेही कारण देण्यात आले नाही. हे खूप विचित्र आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेच एकमेव नाहीत. अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक काढून टाकण्यात आलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आज ट्विटरला नोटीस पाठविली जाईल, अशी माहिती आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक हटविणे ही घटना म्हणजे भारतीय घटनात्मक पदाचा अवमान आहे.
दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, आरएसएस अनेक दशकांपासून या देशात कार्यरत आहे. देशातील आदर्श राजकारणासाठी भाजप आणि आरएसएस उभे आहेत आणि आम्हाला कोणाच्याही ब्लू टिकची गरज नाही.