आंबेगाव बुद्रुक – पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आता स्थानिकांनाही टोल भरल्याशिवाय येजा करता येणार नाही. खेड शिवापूर टोल व्यवस्थापनाकडून आजपासून (दि.1) हा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे स्थानिकांसह सरसकट वाहन चालकांना टोल भरावा लागणार आहे.
खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीसह अन्य राजकीय पक्षांच्यावतीने दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये आंदोलन करून स्थानिकांना टोल सवलतीचे मागणी करण्यात आली होती. कृती समितीच्या आंदोलकांना यशही आले होते. कृती समितीच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तत्कालीन संचालक सुहास चिटणीस, पुणे-सातारा टोल रोड प्रा. लि.चे खेड शिवापूर येथील व्यवस्थापक अमित भाटिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा करून पुढील मार्ग निघत नाही तोपर्यंत एमएच 12 व एमएच 14 च्या सर्व वाहनांना टोल माफी देण्यात येईल, असे पत्र दिले होते. या मुद्यावर अद्याप तोडगाच निघालेला नाही. परंतु, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे व टोलनाका प्रशासनाकडून टोल वसुली करण्यात येणार आहे. दरम्यान, कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना टोल नाक्यावर सवलत देण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी त्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला टोलमुक्तीतून वगळण्यात आले.
एनएचएआय व रिलायन्स इन्फ्रा यांनी आंदोलकांना टोलमाफीसंदर्भात जो काही शब्द दिला होता, तो त्यांनी फिरवला आहे. स्थानिकांचा उद्रेक झाला तर पुढील घटनेला संबंधित प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा दिला प्रशासनाला दिला आहे.
– माउली दारवटकर, खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती
खेड शिवापूर टोलनाक्याच्यापासून 20 किलोमीटरच्या परिघांमधील 130 गावांतील नागरिकांनी स्थानिक मासिक पास काढून घ्यावेत. स्थानिक पास 310 रुपयांना उपलब्ध आहे. टोल प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करीत आहे.
– अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे टोल रोड प्रा. लि. कंपनी