भवानीनगर – इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे; परंतु काही मंडळी विकास कामांमध्ये आडकाठी घालण्याचे काम करीत आहेत. मग 2014च्या अगोदर वीस वर्षे इंदापूर तालुक्याचे नेतृत्व करत होते ते अपयशी का ठरले, तालुक्याचा सर्वांगीण विकास का झाला नाही. असा सवाल आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला.
शिंदेवाडी (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित सभेमध्ये भरणे बोलत होते. श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणेश झगडे व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, गणेश झगडे, डॉ. दीपक निंबाळकर, सचिन सपकळ,
राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, सरपंच पार्थ निंबाळकर, उत्तमराव फरतडे, खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, अनिल काटे, महादेव कचरे, हिंगणेवाडी सोसायटीचे सचिन डांगे, सोपान पवार, अभयसिंह निंबाळकर, श्रीनिवास कदम, सौरभ झगडे, बाळासाहेब झगडे, तुषार सपकळ, महेश सपकाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
भरणे म्हणाले, आपण आमदार, मंत्री झाल्यापासून गटातटाचे राजकारण न करता तालुक्यातील मागासवर्गीय अल्पसंख्यांक गोरगरीब ग्रामस्थांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील कोणत्याही भागातील रस्ता हा चांगल्या प्रतीचा झाला आहे. इंदापूर तालुक्यात पाण्याची योजना अनेक गावांमध्ये आल्याने तसेच इतरही सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याने खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये भर पडलेली आहे व या विकासकामांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच हा विकास आम्ही करू शकलो आहे.
तालुक्यातील सर्व गावांनी माझ्याकडून विकास निधी मिळवून फायदा करून घेतला; परंतु शिंदेवाडी हे गाव विकासाच्या बाबतीत मागणी अभावी मागे राहिले होते आता या गावचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात येईल. यावेळी दोन मंदिराच्या सभा मंडपासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून 15 लाख रुपये व भरणे यांच्या माध्यमातून 25 लाख रुपये असा 40 लाख रुपयांचा निधी देण्याचे भरणे यांनी जाहीर केले.
लाकडी-निंबोडी योजना पूर्णत्त्वास नेणार
लाकडी निंबोडी उपसासिंचन योजना राबवण्यासाठी मागील काळात लोकांनी नुसत्या गप्पा मारल्या. विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून लाकडी निंबोडी योजना 35 टक्के बारामतीसाठी व 65 टक्के इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केली; परंतु काही विरोधकांनी ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.
पाच टीएमसी पाणी मंजूर केले. त्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार होता ही योजना मंजूर झाल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकांना आपल्या विरोधात खोटं नाट सांगून योजना बंद पाडण्याचा षडयंत्र केलं; परंतु ही योजना केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.
अजितदादांचा अधिकाऱ्यांवर वचक
प्रशासनातील अधिकाऱ्यांवर अजित पवार यांचा वचक आहे. त्यामुळे निधी खेचून आणताना व विकास कामे करताना दादांचा फार मोठा फायदा होतो. खासदार सुप्रिया सुळे यांचादेखील तेवढाच फायदा होतो. नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणामुळे काझड-शिंदेवाडी गावाला मागचे दिवस पुढे येणार आहेत.