गांभीर्य नाहीच! करोनाच्या मृत्यू नोंदणीमध्ये दिरंगाई

गांभिर्याचा अभाव : नोंद करण्यास विलंब

पिंपरी – सध्या शहरात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या अकरा महिन्यांपासून करोना शहरात ठाण मांडून बसलेला आहे तरीही अद्याप करोना रुग्ण आणि करोना मृत्यूची माहिती अपडेट सुरळीत करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. वारंवार बजावूनही रूग्णालयांकडून महापालिका वैद्यकीय विभागाला करोना मृत्यूबाबतची माहिती उशिरा दिली जात आहे. पर्यायाने, माहिती “अपडेट’ होत नसल्याने तब्बल आठवडाभरापूर्वीच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 1) वैद्यकीय विभागाच्या करोना अहवालात झाल्याचे आढळले आहे.

शहरामध्ये दररोज 250 ते 425 च्या दरम्यान करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या तीन दिवसांचा अहवाल पाहिला असता, 26 आणि 28 फेब्रुवारीला प्रत्येकी एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर, 27 फेब्रुवारीला करोनाने 4 जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. तुलनेत 1 मार्चला मात्र, हा आकडा तब्बल 11 वर जाऊन पोहचला आहे. त्यामध्ये गेल्या आठवडाभरात झालेल्या 7 मृत्यूंचाही समावेश आहे.

शहरामध्ये सोमवारपर्यंत एकूण 1 हजार 850 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर, सोमवारी दिवसभरात 4 जणांना करोनाने प्राण गमवावे लागले. त्याशिवाय, गेल्या आठवडाभरात झालेल्या 7 मृत्यूंची देखील सोमवारच्या वैद्यकीय अहवालात नोंद आहे. अशा एकूण 11 जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 24 आणि 27 फेब्रुवारीला प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. मृत रुग्णांमध्ये शहर हद्दीतील 8 तर, शहराबाहेरील तिघांचा समावेश आहे.

मृत्यूची माहिती विलंबाने का?
महापालिका प्रशासनाकडे शहरातील रुग्णालयांकडून करोनाने मृत्यूमुखी होणाऱ्या नागरिकांची माहिती तब्बल आठवडाभर उशीराने दिली जात आहे. त्यामुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र समोर येत आहे. करोनाने होणाऱ्या मृत्यूंची माहिती रुग्णालयांकडून दररोज अद्ययावत होणे आवश्‍यक आहे. यापूर्वीही असे अनेकदा घडले आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करु, असे महापालिका प्रशासनाने अनेकदा सांगितले. परंतु कारवाई झाली नाही. यामुळे रुग्णालये देखील महापालिका प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील रुग्णालयांकडून करोनाच्या मृत्यूची माहिती उशीरा प्राप्त होत असल्याने सोमवारच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. रूग्णालयांना करोनाबाधित रुग्ण, करोनामुळे झालेले मृत्यू आणि घरी सोडलेल्या रुग्णांची माहिती दररोज पाठविण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.