राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला करोना लसीचा पहिला डोस

नवी दिल्ली : देशात एक मार्चपासून व्यापक लसीकरणाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपतींनी नवी दिल्लीमधील आर्मी हॉस्पीटल रिसर्च अ‍ॅण्ड रेफ्रल म्हणजेच आर.आर.रुग्णालयामध्ये करोनाची लस घेतली.

एक मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. याच तिसऱ्या टप्प्यामध्ये ७५ वर्षीय कोविंद यांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे.

देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली. लसीकरण मोहीमेच्या या टप्प्यात आमदार, खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे. लशींवर आक्षेप घेण्यापेक्षा विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.