शहरातील सर्व 122 व्हेंटिलेटर रिकामे : करोनाच्या संकेतस्थळावरील माहिती
विशेष कार्य अधिकाऱ्याच्या आदेशानंतर आकडेवारीत सुधारणा
पिंपरी – करोनाबधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची बाब वारंवार निदर्शनास आल्याने डॅशबोर्डवर उपलब्ध बेडची नेमकी संख्या देण्याचे आदेश विभागीय आयुक्तालयाच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कालपर्यंत महापालिकेच्या रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. परंतु आजमात्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बनविण्यात आलेल्या बेड्सच्या डॅशबोर्डवर वायसीएमच्या 12 व्हेंटिलेटरसह शहरातील सर्व 122 व्हेंटिलेटर रिकामे असल्याचे दर्शविण्यात आले. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शहरात रोज करोनाने दहाहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीतही एकाही व्हेंटिलेटरवर रुग्ण नसणे ही आश्चर्याचीच बाब आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील करोबानधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. स्वतः शरद पवार यांनी याबाबत बैठक घेत, मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडूनही प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील कोविड समर्पित रुग्णालये, खासगी रुग्नालये व ताब्यात घेतलेली हॉस्टेल्स यांची एकूण संख्या वाढून तब्बल 90 इतकी झाली आहे. तर त्यामध्ये चार हजार 590 बेड करोना बाधितांसाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी अत्यवस्थ रुग्नांना आयसीयूमधील व्हेंटिलेटरची गरज भासते. ही संख्या 122 एव्हढी आहे. दरम्यान, कोविड-19ची समस्या उद्भवल्यापासून महापालिका क्षेत्रातील वायसीएमसह सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांमधील आयसीयूमधील व्हेंटिलेटर बेड उपलब्धच नसल्याचे आकडेवारी डॅशबोर्डवर उपलब्ध करुन दिली जात होती.
विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दोन्ही महापालिकांच्या प्रशासनाला खडसावत, कोविड-19 च्या उपचारांकरिता डॅशबोर्डवर प्रसिद्ध करण्यासाठी वास्तव आकडेवारी देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कोविड समर्पित व खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधितांसाठी उपलब्ध असलेले बेड, ऑक्सिजन सुविधेसह उपलब्ध असलेले बेड, आयसीयूतील व्हेंटिलेटरसह बेड यांची सुधारित आकडेवारी डॅशबोर्डवर झळकत आहे. यामध्ये आश्चर्यकारकरित्या सुधारणा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. या आकडेवारीनुसार वायसीएममधील आयसीयूतील व्हेंटिलेटरचे 12 बेड रिकामे आहेत. त्यामुळे वायसीएम रुग्नालयात एकही रुग्ण अत्यवस्थ नसल्याचे चित्र आहे.
महापालिकेकडे केवळ 12 व्हेंटिलेटर बेड
करोनासाठी आरक्षित करण्यात आलेल्या एकूण 122 व्हेंटिलेटर बेडपैकी महापालिकेचे केवळ 12 बेड असून उर्वरित खासगी रुग्णालयांचे आहेत. वायसीएमचे केवळ 12 बेड नागरिकांसाठी निशुल्क उपलब्ध आहेत, तर उर्वरित खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेडसाठी शुल्क आकारले जाणार आहे.