जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही : इंदापुरात भरणे यांचा नागरी सत्कार
रेडा -एखाद्याचा फोन उचलू द्या, नाही उचलू द्या. कोणीही राग मानू नका. मला आता नुसती इंदापूरची जबाबदारी नाही. राज्याची जबाबदारी सांभाळायची आहे. तरीदेखील मी कदापि मंत्रिपद मिरवणारा नाही. विकासकामेच करून दाखवेन. देशात सोन्यासारखी माणसं फक्त माझ्या इंदापूर तालुक्यात आहेत. जनतेमुळे जे मंत्रिपद मिळाले. त्या संधीचे सोने करून दाखवेल, अशी ग्वाही जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने व जनतेच्या वतीने राज्यमंत्री भरणे व आमदार यशवंतराव माने यांचा नागरी सन्मान इंदापूर शहरात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मोहोळचे आमदार यशवंतराव माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, पुणे जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई पाटील, प्रतापराव पाटील, इंदापूर तालुका अध्यक्ष महरुद्र पाटील, हनुमंतराव कोकाटे पाटील, अमोल भिसे, वसंतराव आरडे, शुभम निंबाळकर, कार्यकर्ते उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, काही राजकारणी मंडळी पाच वर्षे जनतेत कधीही दिसत नाहीत. मात्र, निवडणूक आली की गाव भेटी सुरू करतात. हे मला कधीच जमलं नाही. मला आता 22 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी द्यायचे आहे. यासाठी काम करणार आहे. 22 गावांच्या हक्काचे पाणी कुणालाही हिसकावून नेऊ देणार नाही. मी करून दाखवणार आहे. मी तुमचे काम करतो. फोल वल्गना करणार नाही.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने राज्यमंत्री भरणे यांना भारताचे संविधान देऊन विशेष सन्मान तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे, उपाध्यक्ष संदीप सुतार, मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार मधुकर गलांडे यांनी केला.
एका महिन्यात यशवंतराव माने आमदार
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये यशवंतराव माने यांनी जिद्दीने चिकाटीने काम केले. ते इंदापूर बाजार समितीच्या उपसभापती पदावर गेले. त्यांच्यामध्ये काम करण्याची धडपड ते मोहोळ विधानसभेला इच्छुक होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते. तब्बल एकाच महिन्यात इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मोहोळ विधानसभेत आमदार झाले. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढले.