राजगुरूनगर – माजी आमदार स्व. साहेबराव बुट्टेपाटील यांनी राजकारणात कृती आणि वृत्ती यांचा आदर्श निर्माण केला असून ते खऱ्या अर्थाने आदर्शवादी चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरोद्गार प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. सुहास कांबळे यांनी केले.
येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात स्व. साहेबराव बुट्टेपाटील यांच्या 19 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, मुरलीधर खांकटे, ऍड. राजमाला बुट्टेपाटील, ऍड. गणेश सांडभोर, महादेव ठाकूर, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्राचार्य डॉ. शिल्पा जगताप, उपप्राचार्य एस. एन.टाकळकर, प्रबंधक कैलास पाचारणे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सुहास कांबळे यांनी प्रथमतः साहेबराव बुट्टेपाटील यांच्या जीवन कर्तृत्वाचा आढावा घेतला. त्यांच्या समाजकारणाचा वसा आपण पुढे घेऊन जायला हवे. त्यांच्या विचारांचा नंदादीप सदैव तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही अपघातावेळी प्रथोमोपचाराची गरज असून तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर रुग्णाला असलेला धोका, रुग्णाचा प्रतिसाद श्वसनाचा मार्ग, शसोच्चावास, रक्ताभिसरण याबद्दल माहिती दिली. जखमी रुग्णांची वाहतूक, अस्तिभंग, मणक्याचा अस्तिभंग, झटके, भाजणे, इलेक्ट्रानिक शॉक, हृदयविकार याबद्दल कोणती प्राथमिक खबरदारी घ्यायची या विषयी माहिती दिली. तसेच बेसिक लाईफ सपोर्ट हा कोर्स विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले डॉ. संदेश कुमार जकाते, डॉ. शैलेजा गायकवाड, अश्विनी पितळे यांनी प्रथोमोपचाराचे प्रात्याक्षिक करून दाखविले.
राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 134 दात्यांनी रक्तदान केले. पुण्याच्या ससून रक्तपेढीचे समाजसेवा अधिक्षक अरुण बर्डे, डॉ. राजश्री चांदोळकर, डॉ. प्रिया त्रिपाठी, डॉ. सुदेश्रा गजभिये, डॉ. सुकृती ठाकूर सहभागी झाले. अक्षय कोळेकर व कोमल गायकवाड या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमांचे आयोजन हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातील विविध विभागांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बी. डी. अनुसे यांनी केले.