सातारा पंचायत समिती सभापती सौ. सरिता इंदलकर यांची सामाजिक बांधिलकी
सातारा (प्रतिनिधी) – सातारा पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. सरिता इंदलकर यांनी अंगणवाडीत शिकणाऱ्या अंध मुलीला दत्तक घेऊन पंचायत समितीच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात इंदलकर यांनी या अनोख्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमास सभापती सौ. सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. कमल जाधव, पंचायत समिती सदस्या सौ. छाया कुंभार, दयानंद उघडे, रामदास साळुंखे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटणशिक्षाधिकारी संजय धुमाळ, महिला व बालविकास अधिकारी खामकर व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुंढे, ता. कराड येथील हुतात्मा जवान संदीप सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सौ. इंदलकर यांनी अंगणवाडीत शिकणाऱ्या प्रांजल संतोष वाघमळे (रा. कण्हेर) या अंध मुलीस दत्तक घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला. सभापती म्हणून मिळणाऱ्या पहिल्या मानधनाची रक्कम या मुलीस देण्याचा निर्णय घेतला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व सौ. वेदांतिकाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे सौ. इंदलकर यांनी सांगितले. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. ढमाळ यांनी आभार
मानले.
‘मला खूप शिकायचेय’
प्रांजल वाघमळे हिचा गुणगौरव सुरू असताना, मला काय देताय, मी कुठे आलेय, किती माणसांचा आवाज येतोय, मी कुठे आहे, हे अंध प्रांजलचे प्रश्न सभागृह छेदून गेले. प्रांजलने यावेळी कविता सादर करुन मला खूप शिकायचे आहे, अशी भावना व्यक्त केली.