नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारात झालेल्या हिंसक निदर्शना दरम्यान पोलिसांनी गोळीबार केला नाही, असे स्पष्टीकरणण गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. पोलिसांनी यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्यावा आरोप करण्यात येत आहे.
महंमद तमीन हा विद्यार्थी त्यावेळी तेथून जात होता. त्यावेळी त्याच्या पायाला गोळी लागल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. मी त्या भागातून जात होतो. त्यावेळी गोंधळाला सुरवात झाली. मी निदर्शक नाही असे सांगूनही पोलिसांनी माझ्या पायावर गोळी झाडल्याचा आरोप त्याने प्रसिध्दी माध्यमांत केला आहे.
या आंदोलनात सहभागी झालेल्या 10 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. या शिवाय अनेक समाज कंटक त्यात सहभागी होत असल्याचे तपासात आढळून आले आहे, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच हे आंदोलन हाताळताना एकही गोळी झाडण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात संसदेत मंजूर झालेल्या का कायद्याच्या निषेधार्थ उत्तरेत आणि ईशान्य भारतात हिंसाचार उफाळला आहे. दिल्लीत अनेक वाहने पेटवून देण्यात आली. दिल्लीत अनेक ठिकाणी मंगळवारी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.