दिल्लीत का कायद्याविरोधात आक्रोश सुरूच; लाठीमार आणि अश्रुधुराची नळकांडी फोडली
नवी दिल्ली : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात पूर्व दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलानाला दिल्लीच्या पूर्व भागातील सीलामपूर आणि जाफराबाद भागात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर तुफानी दगडफेक केली. तर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक ठिकाणी लाठीमार केला. निदर्शकांनी किमान दोन बस पेटवल्या असून अनेक दुचाकी वाहने पेटवून दिली. यामुळे अनेक मेट्रोस्थानके बंद ठेवण्यात आली आहेत.
वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12च्या सुमारास सीलामपूर भागात आंदोलक जमा झाले. त्यांनी का कायदा आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. सीलामपूर पोलिस ठाणेही पेटवून देण्यात आले. त्यानंतर गोकुळपुरी. सीलामपूर, मौजपूर -बाबरपूर ही मेट्रोस्थानके त्यानंतर बंद करण्यात आली.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घुसून रविवारी पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम झोडपले होते. त्याच्या विरोधात हा जमाव निदर्शने करत होता, असे पोलिसांनी सांगितले. या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले, असे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. शांततेने हे आंदोलन सुरू होते. मात्र त्यानंतर त्यास हिंसक वळण लागले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्यावरील मोटारींचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर दगडांचा सडा पडलेला होता. अनेक ठिकाणी पेटलेल्या वस्तूंमुळे हवेत धुराचे लोट दिसत होते,असे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.
बातम्यांमध्ये पोलिसांवर आंदोलक तुफान दगडफेक करत असल्याचे दाखवण्यात येत आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी लाठीमार करून आंदोलकांना पांगवल्याचे चित्र आहे. या भागात किमान दोन बस पेटवण्यात आल्या. तर अनेक दुचाकी वाहनांना संतप्त निदर्शकांनी पेटवून दिले. वरीष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून निदर्शकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
सीलामपूर भागात निदर्शकांना पुढे जाण्यापासून पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने जमाव हिंसक बनला. या संघर्षानंतर पोलिसांनी सीलामपूर जाफराबाद रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणची मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आली आहेत. या स्थानकावर मेट्रो थांबवल्या जात नाहीत.