नंदुरबार – झोका खेळताना दोरीत अडकून फास बसल्यामुळे 9 वर्षीच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात मंगलमूर्तीनगर येथे घडली आहे. विशेष म्हणजे एकीकडे परिवारात मुलीचा जन्म झाला तर दुसरीकडे मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिवाराच्या आनंदात विरजन पडले आहे.
यश अग्रवाल असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशाच्या मृत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
9 वर्षीय यश हा घरात दोरीच्या झोक्यावर खेळत होता. झोका घेत असताना तो अचानक खाली पडला दरम्यान या झोक्याच्या दोरीचा फास यशच्या मानेभोवती आवळल्या गेला. त्यानंतर तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. यश खाली पडलेला घरकाम करणाऱ्या मोलकरणीला दिसला. तिने लगेचच घरातील लोकांना आवाज दिला. त्यानंतर यशला उपचारासाठी तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.