पिंपरी – “आम्ही इथले भाई आहोत’ , असे म्हणत तीन जणांनी नऊ वाहनांची तोडफोड केली. तसेच एकाला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी(दि.6) पहाटेच्या सुमारास घडली. पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रवीण कुंजीर (रा. पिंपळे सौदागर) यांनी रविवारी (दि. 6) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी रोहिदास तेलंग, प्रवीण म्हस्के आणि संतोष महेश माळी अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर मधील काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन चौक या रस्त्यावर पार्क केलेल्या नऊ वाहनांची आरोपींनी लोखंडी रॉड व दगडाच्या साहाय्याने आरडा-ओरडा करीत तोडफोड केली.
त्यावेळी फिर्यादी प्रवीण कुंजीर हे आरोपींना अडविण्यासाठी आले असता आम्ही म्हणाले की आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत लोखंडी रॉड कुंजीर यांना मारला. मात्र त्यांनी चपळाईने तो वार चुकविला. जर लोखंडी रॉड फिर्यादी कुंजीर यांना लागला असता तर त्यांचा जीवही गेला असता, हे आरोपींना माहिती असतानाही त्यांनी हा प्रकार केला. दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपी निष्पन्न केले. तसेच आरोपींना ताब्यात घेऊन पिंपळे सौदागर परिसरात त्यांची धिंड काढली.
गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या दिवशीच राडा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. असे असतानाही ही घटना घडल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.