मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेडचा काल मुंबईत संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट तुलना गाढवाशी करत अजून किती ओझे वाहणार? असा प्रश्न केला आहे. त्यांच्या या टीकेमुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी,“आता तुम्ही डोळे उघडून आला आहात, त्यामुळे शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडबरोबर हातमिळवणी केली आहे. मार्गक्रमण करत असताना आपल्याला रस्त्यावर कुठे खड्डे आहेत आणि कुठे काटे आहेत, हे माहीत असायला हवं. सध्या सरकारमध्ये दुसऱ्यांची ओझे वाहणारी गाढवंदेखील आहेत. ‘सामना’ चित्रपटात एक गाणं आहे, ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’. त्यामुळे मला बिचाऱ्या देवेंद्रजींची दया येते. ते अजून किती ओझे वाहणार? पण त्यांची पंचाईत अशी झाली आहे की, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.” असे म्हणार फडणवीसांवर टीका केली.
पुढे बोलताना ठाकरे यांनी,“त्यांच्या सरकारची अवस्था गोविंदांप्रमाणे थर लागतात की काय? अशी झाली आहे. एक चढला की दुसरा चढत आहे. त्यामुळे सरकारमध्ये किती उपमुख्यमत्री नेमणार आहात? म्हणजे आधी एक पक्ष चोरला, त्यानंतर दुसरा पक्ष चोरला. आता कुणीतरी सांगत होतं की, ते काँग्रेसही फोडतायत. त्यामुळे राज्यात किती उपमुख्यमंत्री होणार? आणि देवेंद्र फडणवीस फक्त ‘मस्टर मंत्री’ राहणार की काय? ते फक्त वही घेऊन कोण आला? याची नोंद ठेवणार का?” असा सवालही त्यांनी विचारला.
त्यासोबतच उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, “आता भाजपात राम राहिला नाही, जे आहेत ते सगळे ‘आयाराम’ आहेत. पण आमच्या हृदयात असलेला राम तुम्ही काढू शकत नाही. भाजपा हा आता आयारामांचा पक्ष झाला आहे. तुम्ही राम मंदिर बांधाच पण आता तुम्ही आयाराम मंदिर बांधलं आहे. त्याचं काय करायचं? परिणामी भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना आयारामांची पूजा करावी लागतेय, याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही.” असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली.