पुणे – खडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरणही भरले आहे. त्यामुळे पानशेत धरणातून रविवारी सायंकाळी सात वाजता 595 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पांत एकूण पाणीसाठा 88 टक्के म्हणजे 25.61 टीएमसी इतका जमा झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या धरणसाठ्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष असते.
यंदा काहीसा विलंबाने पाऊस सुरू झाला. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने तळाला गेलेल्या पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला.
खडकवासला धरणात रविवारी दिवसभरात 1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर पानशेतमध्ये 8 मिमी, वरसगावमध्ये 10 मिमी आणि टेमघरमध्ये 9 मिमी इतका पाऊस पडला आहे. खडकवासला धरण जुलै महिन्यातच 100 ट्क्के भरले. त्यानंतर खडकवासला धरणातून कालव्याद्वारे 1 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीतही खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 96 टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यंदा पहिल्यांदाच पानशेत धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाचे नाव टीएमसी टक्केवारी
खडकवासला – 1.83 92.61
पानशेत – 10.18 95.58
वरसगाव – 11.09 86.53
टेमघर – 2.51 67.82