नागपूर : राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नागपुरात आज 9 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 6 जण शांतीनगर परिसरातले आहेत. तर 1 जण सतरंजीपुरा परिसरातील आहे. इतर दोघे मोमीनपुरा आणि कुंदनलाल गुप्ता नगरमधील आहेत.
आज ज्या 9 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सर्वांना आधीपासूनच आमदार निवास येथे क्वॉरंटाईन करण्यात आले होते. शांतीनगर परिसरातून मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यामुळे आता शांतीनगर परिसरातील अनेक वस्त्या सील करण्यात आल्या आहेत.
नागपुरात आजवर आढळलेल्या 72 कोरोना बाधितांपैकी आतापर्यंत 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच कोरोना रुग्णाच्या संपर्कात येऊन मोठ्या संख्येने संक्रमण होऊन नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.