वडूज – खटाव तालुक्यातील वडूज शहरांतील जे. सी. शहा या पेट्रोल पंपावर पोलिसांनी कारवाई करत पेट्रोल पंपमालक व कामगारांवर गुन्हा दाखल केला. याबाबत वडूज पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही डिझेल व पेट्रोल न देण्याचे आवाहन केले आहे. परंतु आर्थिक फायदा करून घेण्याचा उद्देशाने अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्या लोकांना या पेट्रोल पंपावर पेट्रोल देत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी पंपाचे मालक विकल्प जवाहर शहा व अन्य आठ कामगार अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पंपाची सुरवात झाल्यापासून या पेट्रोल पंपावर ही पहिलीच कारवाई झाली आहे. ही कारवाई होण्या अगोदर पोलीसांनी व्यवस्थापनास कोणत्याही प्रकारची समज दिली नाही. एक पोलीस कर्मचारी आले व त्यांनी केवळ मालक, कामगारांची नावे घेऊन जात थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मालक शहा यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी कसल्याही प्रकारची गर्दी, गोंधळ नव्हता.
उलटपक्षी पोलीस कर्मचारीच तेथील गर्दीचे नियोजन करण्याबरोबर ओळखपत्र पाहून वाहने आत सोडत होते. शिवाय वाहनांचीही कोणतीही गर्दी नव्हती काही मोजकीच अत्यावश्यक सेवेतील वाहने त्या ठिकाणी इंधन भरून बाहेर पडल्यानंतर पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे सर्वते सीसीटीव्ही फूटेज आपणाकडे असून आम्हाला नाहक मनस्ताप झाला आहे. त्याचबरोबर संकटसमयी आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या गरीब कामगारांचे मनोधैर्य खचले आहे, असे त्यांनी सांगितले.