न्हावरे पोलिसांची कारवाई
न्हावरे – आलेगाव पागा (ता.शिरुर) येथे गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाळगणाऱ्या दोघां जणांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडून अटक केली आहे.अशी माहिती न्हावरे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी दिली.
आलेगाव पागा येथे गावठी दारु बनविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाळगल्याच्या कारणास्तव गोकुळ बापू पवार (रा.वाळकी, ता.दौंड) व श्रीराम देविदास गुळवे (रा.आलेगाव पागा, ता.शिरूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
आलेगाव पागा येथील ग्रामस्थांनी दिलेल्या खबरीनुसार, गोकुळ पवार हा आलेगाव व वाळकी परिसरात गावठी दारू तयार करून त्याची व्रिक्री करत होता. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक सुनील मोटे, पोलिस हवालदार प्रल्हाद जगताप, डी.एस.खोमणे, पी.के.राऊत, के.जी. पठारे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आलेगाव पागा परिसरात छापा टाकला असता, गोकुळ पवार हा येथील रांजणगाव सांडस रस्त्यावर ९ किलो काळा गुळ, पांढऱ्या रंगाची नवसागराची वडी, इस्ट पावडर असे एकूण १३०० रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
गावठी दारू बनवण्याच्या वस्तू गोकुळ पवार याने आलेगाव पागा येथील दुकानदार श्रीराम गुळवे याच्याकडून खरेदी केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच वरील घटनेत सापडलेला माल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेमुळे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री करणाऱ्यांना काही प्रमाणात चाप बसणार आहे.
न्हावरे परिसरात कारवाई कधी?
न्हावरे गावासह परिसरात लॉकडाऊनच्या काळात गावठी, देशी, विदेशी दारू मोठ्या प्रमाणावर सर्रास मिळत आहे. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई न्हावरे गावात होणे आवश्यक आहे, अशी मागणी ग्रामस्थांकडून वेळोवेळी होत आहे. ग्रामस्थांनी कित्येकदा न्हावरे पोलिसांना अवैध दारू धंद्यांवर कारवाईची मागणी करूनही अवैध दारू धंद्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात कोठे दारू मिळाली नाही तरी, न्हावरे गावासह परिसरात हमखास दारू मिळते, अशी धारणा तळीरामांची आहे. त्यामुळे याठिकाणी तळीरामांची कायम गर्दी असते.याबाबत पोलीसही अनभिज्ञ नाहीत.