लोणावळा, (वार्ताहर) – वेहेरगाव परिसरात अवैधरित्या सुरू असलेली दारूची हातभट्टी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केली आहे. तसेच येथे गावठी दारू बनवण्यासाठी आवश्यक असणारे चार बॅरलमध्ये ठेवलेले ४० हजार ८०० रुपये किमतीचे ८०० लिटर रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले.
प्रकरणी महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे यांनी फिर्याद दिली. लोणावळा ग्रामीण पोलिसांना वेहेरगाव परिसरातील देवकर वस्ती येथे बेकायदेशीर गावठी दारू तयार करणारी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
त्याच्या आधारे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, सागर आरगडे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे तसेच किशोर पवार, सूरज गायकवाड, रवींद्र ठोंबरे, उत्तम सांडभोर यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी त्यांना हातभट्टी बनवण्याच्या तयारीत असलेली एक महिला मिळून आली. पोलिसांनी तात्काळ ही हातभट्टी उध्वस्त केली. तसेच गावठी दारू बनवण्यासाठी लागणार तेथील सर्व रसायन नष्ट केले. तर, आरोपी महिलेच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.