#CWC19 : मी देशासाठीच खेळतो – मलिंगा

लीड्‌स – मी कोणी मोठा खेळाडू नाही. विश्‍वचषक स्पर्धेत पदार्पण करताना मी देशासाठीच खेळलो होतो आणि आजही माझ्या संघासाठीच खेळत आहे. या प्रवासात विक्रम होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे असे श्रीलंकेचा वरिष्ठ गोलंदाज लसिथ मलिंगा याने येथे सांगितले. त्याने इंग्लंडविरूद्ध चार गडी बाद करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

त्याचप्रमाणे त्याने विश्‍वचषक स्पर्धेच्या कारकीर्दीत 50 विकेट्‌स घेण्याचीही कामगिरी केली. विश्‍वचषक स्पर्धेत पन्नास विकेट्‌स घेणारा मलिंगा हा श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी त्यांच्या मुथय्या मुरलीधरन याने हा मान मिळविला आहे. त्याने 68 गडी बाद केले आहेत.

इंग्लंडविरूद्ध आम्हाला अपेक्षेइतक्‍या धावांचे आव्हान ठेवता आले नाही. विजयासाठी 233 धावांचे लक्ष्य त्यांना सहज शक्‍य होते. मात्र आम्ही अचूक टप्प्यावर मारा करण्याचे धोरण आखले. आम्हा गोलंदाजांनी योग्य दिशा व टप्पा ठेवीत गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनीही आम्हाला मोलाची साथ दिली. त्यामुळेच एक वेळ अशक्‍य वाटणारा विजय आम्ही साकार करू शकलो असे मलिंगा याने सांगितले. तो पुढे म्हणाला की, बेन स्टोक्‍स हा एका बाजूने आक्रमक खेळ करीत असली तरी दुसऱ्या बाजूने त्याच्या सहकाऱ्यांना बाद करायचे आमचे नियोजन यशस्वी ठरले.

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने याने मलिंगाचे कौतुक करीत सांगितले की, फलंदाजीत अँजेलो मॅथ्युजने विजयाचा पाया रचला. मलिंगाने त्यावर कळस चढविला. मलिंगा हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. तो मैदानावर असताना आम्हाला कसलीही चिंता वाटत नाही. खेळपट्टी कोरडी व ठणठणीत होती. तरीही त्याने कल्पकतेने गोलंदाजी करीत संघास सनसनाटी विजय मिळवून दिला.

अर्धशतकी गोलंदाज :

1) ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलिया 71 विकेट्‌स
2) मुथय्या मुरलीधरन, श्रीलंका 68 विकेट्‌स
3) वासिम अक्रम, पाकिस्तान 55 विकेट्‌स
4) लसिथ मलिंगा, श्रीलंका 50 विकेट्‌स

Leave A Reply

Your email address will not be published.