दहशतवाद्यांचा अर्थ पुरवठा पुर्ण रोखण्यासाठी पाकिस्तानला ऑक्‍टोबर पर्यंत मुदत

पाकिस्तान कार्यवाही करण्यात अपयशी

अन्यथा ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ शकते नाव

वॉशिंग्टन – फायनान्शीयल ऍक्‍शन टास्क फोर्स म्हणजेच एफएटीएफ आंतरराष्ट्रीय संस्थेने पाकिस्तानला दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यात आलेल्या अपयशाबद्दल चांगलेच फैलावर घेतले आहे. येत्या ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पाकिस्तानने यावर प्रभावी उपायोजना करून दहशतवाद्यांचे सर्व आर्थिक स्त्रोत बंद करावेत अन्यथा या देशाला काळ्या यादीत टाकले जाईल. त्यामुळे पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणे दुरापास्त होईल असे या संस्थेने म्हटले आहे.

पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा आढावा घेण्यात यावा अशी सुचनाही त्या देशांना करण्यात आली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना विविध स्त्रोतांमधून पैसा मिळतो आहे. मनि लॉड्रिंगच्या व्यवसायातूनही दहशतवाद्यांना मदत केली जात आहे. या प्रकारांमुळे गेल्यावर्षी जून महिन्यात या संघटनेने पाकिस्तानला ग्रे यादीत टाकले होते. त्यानंतर त्या देशाच्या उपाययोजनांच्या संबंधात एफएटीएफ या संस्थेच्या ऑरलॅंडो शहरात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी पाकिस्तानने या विषयी कोणतीही प्रभावी उपायोजना केलेली नाही असे मत यावेळी नमूद करण्यात आले. पण यासाठी पाकिस्तानला ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत आणखी मुदत देण्यात आली आहे.

मात्र त्यानंतर पाकिस्तानवरील कारवाईचे स्वरूप ठरवले जाणार आहे. त्या अनुषंगाने पाकिस्तानवर आर्थिक निर्बंधही लागू शकतात. पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. त्यांना त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठी मदत अपेक्षित आहे. पण या संस्थेचे जोपर्यंत समाधान केले जात नाही तो पर्यंत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून आर्थिक सहाय्य मिळवणेही जिकरीचे बनणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.