पौड – पौड (ता. मुळशी) येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांना झालेल्या मारहाणीत दोन जण जखमी झाले. या हल्ल्यात एकाचे दोन्ही हात मनगटापासून तुटून खाली पडले. या प्रकरणी सौरभ राजेंद्र बानगुडे (वय 21, रा. बानगुडेवाडा, आंदेशे, ता. मुळशी) यांनी पौड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ राजेंद्र बानगुडे हा बुधवारी (दि. 10) सकाळी कोंढावळे जवळील पंपावर गाडीत पेट्रोल टाकत असताना येथे शंकर आखाडे, श्रीवर्धन ऊर्फ दादा तिकोणे, ऋषिकेश ढेपे यांनी त्याला शिवीगाळ केली.
त्याच्याकडील पिकअप घेऊन हे तिघेही पौडच्या दिशेने निघून गेले. यानंतर सायंकाळी चारच्या दरम्यान शंकर आखाडे याने अक्षय विजय कडू याला पौडजवळील विठ्ठलवाडी फाटा येथे ये, झालेला विषय मिटवून घेऊ असे सांगितले.
त्यावेळी अक्षय कडू यांच्या बरोबर जाताना सौरभ बानगुडे, गौरव श्रीकांत धनवे, समीर बारमुख, रिहान रिजवान शेख, विशाल बंडू शिर्के, आकाश दिलीप शिंदे, तेजस सुनिल बानगुडे, ऋतिक येवले हे होते. शंकर आखाडे याच्या घराजवळ आल्यावर शंकर आखाडे व अक्षय ऊर्फ चक्या कडू यांच्यात वाद सुरू झाले.
याच दरम्यान घराच्या छतावर असलेले आकाश राम दाभाडे (रा. दखणे, ता. मुळशी), श्रीवर्धन ऊर्फ दाद्या तिकोणे, मारूती बाळू आखाडे, शंकर बाळू आखाडे, ऋषी ढेपे, शिऱ्या ऊर्फ वैभव वाघचौरे (सर्व रा. पौड) व इतर 5 ते 6 आरोपींनी हातात हत्यार घेऊन अक्षय ऊर्फ चक्या कडू याच्या हातावर व पाठीत व तेजस बानगुडे याच्या मानेवर वार केले.
तसेच आकाश दिलीप शिंदे याच्या मानेवर तसेच डोक्यावर वार करत असताना त्याने वार वाचविण्यासाठी हात वर केले असता त्याच्या हातावर वार केले. यात आकाश याचे दोन्ही हात मनगटापासून तुटून जमिनीवर पडले होते. हल्ल्यानंतर सर्वजण चार दुचाकीवरून पळून गेले असून ते फरार झाले आहेत.
हल्ल्यानंतर जखमी तिघांना त्यांच्या मित्रांनी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी पौड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. आकाश याचे दोन्ही तुटलेले हात पिशवीत घालून दवाखान्यात आणण्यात आले होते. जखमीतील अक्षय कडू व तेजस बानगुडे यांना उपचारासाठी ससून रूग्णालयात तर आकाश शिंदे याला पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलीस नाईक प्रशांत बुनगे, हवालदार संदीप सपकाळ करीत आहेत.