- पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रात्यक्षिकाचा समावेश करण्याचे सूचवले
पुणे – वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम अधिक रोजगारक्षम करण्यासाठी त्यात आमूलाग्र बदल करण्याची सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केली आहे. वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रत्येक अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकेचा समावेश करावा. जेणेकरून विद्यार्थी नोकरी किंवा उद्योगात सक्षम होऊ शकेल, या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचे सूचित केले आहे.
विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग विविध शाखांची अध्यपन निष्पत्ती ठरवत आहे. यानुसार वाणिज्य शाखेबाबत, विद्यार्थ्यांना अतिरिक्त कौशल्य शिक्षण देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. वाणिज्य शाखेच्या पदवीसोबतच शाखेतील विशेष प्राविण्य मिळवण्याची संधी मिळणार आहे. अकाउंटिंग, फायनान्स, व्यवस्थापन, मार्केटिंग, मनुष्यबळ, कम्प्युटर ऍप्लिकेशन इन बिझनेस, टॅक्सेशन, बिझनेस लॉ आणि उद्यमशीलता अशा विविध क्षेत्रांत संशोधन करता यावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रात्साहन देण्यासाठी त्यादृष्टीने अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
याचबरोबर यापुढे केवळ लेखी परीक्षेवरच सर्व गुण अवलंबून असतील, असे नाही.
कारण या सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रत्येक अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिकांचा समावेश करावा. वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना पूरक अभ्यासक्रमही देण्यात यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. शिवाय, विद्यार्थी परिपक्व व्हावेत, यासाठी त्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण द्यावे, असेही यात सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर न करता विषयतज्ज्ञ करावे, या उद्देशाने आयोगाने प्रत्येक विषयाचे “लर्निंग आउटकम करिक्युलम फ्रेमवर्क’ जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सूचना व शिफारशी 17 फेब्रुवारीपर्यंत locfugc@gmail.com वर मेल करावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे.