कोल्हापूर (मुरगुड) – नगरपालिकेला मिळालेल्या स्वच्छता पुरस्कार वितरण सोहळ्याला उपनगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांना का नेलं नाही ? असा जाब विचारत काही नगरसेवकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष राजे खान जमादार यांना मारहाण केली. आज मुरगुड नगरपालिकेची सभा झाल्यानंतर हा प्रकार घडला.
मुरगूड नगरपालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छता पुरस्कार स्विकराण्यासाठी उपनराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांच्यासह इतर नगरसेवकांना नेले नाही असा जाब काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांना विचारला. यावरून वाद सुरू झाला आणि नगरसेवकांनी सभात्याग केला. नंतर महिला नगरसेवकांनी या संदर्भात विचारण्यासाठी नगराध्यक्ष कक्षात गेल्या असता, त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली यावरून वादावादी होऊन नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण करण्यात आली.
नगर पालिकेत मंडलिक गटाची सत्ता आहे. मात्र या पूर्वीपासूनच नगराध्यक्ष विरुद्ध उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक असा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या विषयावरून उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके आणि काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे मंडलिक गट चर्चेत आलेला आहे.नगरसेवक यांच्यातील वादामुळे मोठा गोंधळ होऊन नगरपालिकेत लोकांची मोठी गर्दी झाली होती.