पुणे-मुंबई ‘हायपरलूप’वर अखेर शिक्‍कमोर्तब

पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे-मुंबईदरम्यान हाती घेतलेल्या हायपरलूप हा प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हायपरलूप प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपर लूप टेक्‍नॉलॉजीज, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामध्ये दोन टप्प्यात 70 हजार कोटींची परकीय गुंतवणुक होणार आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाने पुणे-मुंबई हा प्रवास फक्त 23 मिनिटांत करणे शक्‍य होणार आहे. यामुळे स्वप्नवत वाटणारा हायपरलूप प्रकल्प उभारण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा हायपूरलूप हा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी व्हर्जिन हायपरलूप कंपनीबरोबरच करार करण्यात आला आहे. हा ट्रॅक पुणे-मुंबई महामार्गावर उभारण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार सल्लागार यांची नियुक्ती करण्यासही पीएमआरडीएला मान्यता यापूर्वीच दिली आहे.

त्यासाठी संबंधित कंपनीला पूर्वव्यवहार्यता पडताळणी अहवाल (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) सादर करण्यास सांगण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्याचे काम देण्यात आले होते. कंपनीकडून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मान्यतेला पाठविण्यात आला होता. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे.

द्रुतगती मार्गाला समांतर ट्रॅक

हायपूर लूपचा “डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’ अर्थात पथदर्शी प्रकल्प हा 11.80 किलोमीटर लांबीचा असणार आहे. ट्रॅक 14 मीटर रूंदीचा तर 10 मीटर रूंदीचा सर्व्हिस रोड असा मिळून सुमारे 24 मीटरचा ट्रॅक असणार आहे. ही सर्व जमीन खासगी मालकीची आहे. गहूंजे येथील टाऊनशीपच्या मागील बाजूपासून तो उर्से टोलनाक्‍याच्या पुढे दोन किलोमीटरपर्यंत असणार आहे. एक्‍स्प्रेस-वेला हा ट्रॅक समांतर असणार आहे. भविष्यात तो पुणे- मुंबई मार्गावर उभारण्यात येणाऱ्या हायपर लूपला जोडण्यात येणार आहे.

ठळक वैशिष्टये –

* पुणे-मुंबई दरम्यान 117.50 किमीचा हायपरलूप हा अत्याधुनिक परिवहन प्रकल्प
* पुणे -मुंबई हे अंतर 23 मिनिटांत होणार पार
* 496 किमी प्रतितास वेग प्रस्तावित
* या प्रकल्पामध्ये दोन टप्प्यांत 70 हजार कोटींची परकीय गुंतवणुक होणार
* पहिला टप्पा 11.80 किमीचा पथदर्शी प्रकल्प
* अडीच वर्षात पहिला टप्पा राबविणार
* पहिल्या टप्प्यासाठी 5 हजार कोटी खर्च
* दुसऱ्या टप्प्यात पुणे -मुंबई पूर्ण प्रकल्पाची होणार अंमलबजावणी
* संपूर्ण प्रकल्प सहा ते आठ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

1 हजार 80 किलोमीटर ताशी वेग

हायपरलूप हा वाहतुकीचा एक नवीन प्रकल्प असून कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्‍टो -चुंबकीय प्रणोदकांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. अत्यंत जलद व थेट अशा वाहतुकीचा प्रकार असून 1080 किलोमीटर ताशी वेग असणारी ही वाहतूक व्यवस्था आहे. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्‍वासार्ह वाहतूक प्रणाली असून हायस्पीड रेल सिस्टीमच्या खर्चाच्या दोन तृतीयांश इतक्‍या खर्चात ही यंत्रणा विकसित करण्यात येईल. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.