मुंबई – तथाकथित मोदी मॉडेलचा देशभर खूप गवगवा झाला होता. पण ते मॉडेल बोगस होते याचा जसा प्रत्यय गुजरातमध्ये आला तसाच प्रत्यय या करोना काळात अन्यही भाजपशासित राज्यांमध्ये आला आहे. त्यातून या मॉडेलचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ततेअनंत गाडगीळ यांनी केली आहे.
गुजरात सरकारच्या कारभाराचे वाभाडे गुजरात उच्च न्यायालयानेच काढले आहेत. त्यातून हे अकार्यक्षम मॉडेल साफ उघडे पडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या संबंधात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात एकीकडे सामूहिक मैदानात प्रेते जाळत असल्याचे फोटो परदेशी वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले, त्याचवेळी गंगेतूनही असंख्य प्रेते वाहात असल्याची छायाचित्रे सगळीकडे प्रसारित झाली.
गोव्यात ऑक्सिजनअभावी अनेक जण दगावले, कर्नाटकातील स्थिती तर इतकी हाताबाहेर गेली की बंगलळुरू शहरातील महापालिकेच्या 13 पैकी 7 स्मशानभूमी करोना मृतांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
भाजपशासित राज्यांमध्येच मोदी मॉडेलच्या कार्यशैलीचा साफ फज्जा उडाल्याचे यातून दिसून आले आहे, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.