बीजिंग – चीनच्या वायव्य भागामध्ये डोंगराळ भागात आयोजित केलेल्या एका अल्ट्रामॅरेथॉनवर गारांच्या पावसाचा मारा झाल्यामुळे आणि गारांच्या पावसाबरोबर कडाक्याची थंडीमुळे तब्बल 21 खेळाडूंचा गारठून मृत्यू झाला.
या गोठवून टाकणाऱ्या हिमवर्षावामध्ये अडकलेल्या धावपटूंना सुखरूप वाचवण्यासाठी तब्बल 700 कर्मचाऱ्यांना तैनात करावे लागले होते.
रात्रभर चाललेल्या या बचाव मोहिमेदरम्यान या अल्ट्रामॅरेथॉनमधील 151 धावपटू सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये एकूण 172 धावपटू सहभागी झाले होते. त्यापैकी 21 धावपटूंचा या गारांच्या वर्षावात मृत्यू झाला, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.
अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्यामुळे धावपटूंना अस्वस्थ वाटायला लागले होते. तसेच तापमान अचानक खाली घसरल्यामुळे उंच डोंगरावरच्या खेळाडूंना श्वास घेण्याचाही त्रास होऊ लागला होता, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या अल्ट्रामॅरेथॉनमध्ये धावपटूंना तब्बल 2 ते 3 हजार मीटर (अंदाजे 6,500 ते 9,800 फूट) उंचीवर 100 किलोमीटर (60 मैल) लांबीच्या शर्यतीत धावायचे होते. गानसू प्रांतातील बैयिन शहरातील यलो रिव्हर स्टोन फॉरेस्ट टूरिस्ट साइटमध्ये शनिवारी शर्यत घेण्यात आली होती. हे धावपटू व्यवसायिक नव्हते.
मृतांपैकी एक सुप्रसिद्ध धावपटू लिआंग जिंग होता, त्यांनी यापूर्वी 100 किलोमीटरची शर्यत जिंकली होती.
शर्यतीच्या दिवसासाठी अत्यंत विपरीत हवामानाचा अंदाज नव्हता, असे आयोजकांनी सांगितले. तथापि, “नॅशनल अर्ली इन्फोर्मेशन सेंटर’च्या बेयिन शहराच्या स्थानिक शाखेने गेल्या तीन दिवसांपासून गारपीट व जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला होता.