मुंबई – उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे अधिवेशन सुरु असताना थेट संयुक्त सभागृहात जाऊन बसले. पण त्यांची ही चूक आदित्य ठाकरे यांनी लक्षात आणून दिल्याने नार्वेकर हे लागलीच सभागृहाच्या बाहेर पडले. मात्र, या प्रकारामुळे राजकीय वतुर्ळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिलिंद नार्वेकर हे सभागृहात जाऊन बसल्यानंतर त्यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रेक्षक गॅलरी समजून मी चुकून सभागृहात जाऊन बसलो, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु सुरक्षारक्षकांनी कसे काय कोणतीही तपासणी न करता नार्वेकर यांना सभागृहाच्या आत सोडले? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होओ, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नार्वेकरांना बऱ्याच दिवसांपासून आमदार होण्याची इच्छा आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी ती पूर्ण केलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगविला.
एकनाथ शिंदेंशी जवळीकता?
मिलिंद नार्वेकर हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांना भेटत राहिल्याने या सरकारमध्ये नार्वेकरांना महत्त्व आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवात नार्वेकरांच्या घरी गेले होते. त्यानंतर या दोघांमधील मैत्री उघड झाली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतही मिलिंद नार्वेकर साऱ्यांचे मित्र असल्याने ते चांगल्या मतांनी जिंकल्याचे फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी देखील नार्वेकरांची जवळीक वाढल्याचे आता बोलले जात आहे.