मुंबई – ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून ठाकरे गटाला शह देण्यासाठी मोठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहाय्यक आहेत. नार्वेकर हे शिंदे गटात किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. एका वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार, ठाकरे गट पूर्णपणे पोखरून काढण्यासाठी नार्वेकर हे अत्यंत जालीम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. ठाकरेंच्या पडत्या काळात मिलिंद नार्वेकर यांनी प्रचंड साथ दिली आहे. शिवाय शिवसेना आणि ठाकरे कुटुंबातील इंत्थभूत माहिती नार्वेकरांकडे असते. त्यामुळे, नार्वेकरांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यास उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वांत मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे. तसेच मिलिंद नार्वेकर महायुतीत आल्यास त्यांचेही नाव या शर्यतीत घेतले जात आहे. असे झाले तर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. एका मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या पक्षबदलाबद्दल प्रतिक्रिया दिली होती.