मुंबई – महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी या नोंदणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या धीम्या प्रतिसादाबद्दल पक्ष श्रेष्ठींना काय जबाब द्यायचा असा सवाल त्यांनी प्रदेश कॉंग्रेसला केल्याचे वृत्त आहे.
कॉंग्रेसच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला जानेवारी 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त डिजीटल सदस्य नोंदणी करणार असा दावा केला होता. मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्य नोंदणी अभियान आहे.
हे अभियान यशस्वी करण्यात महाराष्ट्रातून मोठे योगदान देऊन देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू, असे पटोले म्हणाले होते.
मात्र एका संकेतस्थळावरील बातमीनुसार महाराष्ट्र कॉंग्रेसला मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 1 कोटी सदस्य नोंदणीचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, आता मार्चअखेर सुरु आहे. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असताना अद्याप 10 लाख सदस्य नोंदणीचा टप्पाही महाराष्ट्र कॉंग्रेसला गाठता आलेला नाही. यावरुन एच. के. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आता दिल्ली हायकमांडला काय स्पष्टीकरण द्यायचे, असा सवाल पाटील यांनी या बैठकीत विचारला. महाराष्ट्राच्या तुलनेत तेलंगणा आणि कर्नाटकची कामगिरी चांगली आहे. मग महाराष्ट्रात इतका निरुत्साह चांगला नसल्याची खंतही पाटील यांनी व्यक्त केलीय.