मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. देशमुखांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी मुंबईच्या उच्च न्यायालयात शुक्रवार 8 एप्रिल रोजी होईल.
मनी लॉंड्रिंग अर्थात आर्थिक अफरातफर आणि खंडणी वसुली प्रकरणी अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. ते सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. अनिल देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री उशिरा अटक केली होती. ईडीने खोटे आरोप केले आहेत, असा दावा करत अनिल देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.
अनिल देशमुख यांच्या दाव्यावर ईडीला उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होईल. या सुनावणीवेळी ईडीचे वकील त्यांचे म्हणणे मांडतील.