नवी दिल्ली – ब्रायन लारा हे नाव क्रिकेटच्या क्षितीजावर जेव्हा उगविले तेव्हा आपल्या सचिन तेंडुलकर याच्याप्रमाणे त्याच्याबाबत अनेकांनी महान बनण्याची क्षमता असलेला फलंदाज असे वर्णन केले होते. मात्र, लाराने सचिनलाच नाही तर जागतिक क्रिकेटमधील प्रत्येक फलंदाजाला मागे टाकले व विक्रमांची बरसात केली. खरेतर सचिनच्या चाहत्यांना हे पटणार नाही पण जगभरातील क्रिकेट जाणकार आजही लारा सचिनच्या एक सेंटीमिटर का होईना पण पुढे आहे असे म्हणतात.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या व अखेरच्या कसोटीत लाराने याच महिन्याच्या 12 तारखेला 15 वर्षांपूर्वी नाबाद 400 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. हा कसोटी सामना जरी अनिर्णित राहिला असला तरीही लाराने त्या दिवशी महानतेचा मुकुट आपल्या शिरावर परिधान केला. याबाबत एक आठवण सांगितली जाते. एकदा लारा इंग्लंडमध्येच एका कसोटीत खेळत होता. त्यातही त्याने शतकी खेळी केली होती, ती देखिल समोरचे फलंदाज एका पाठोपाठ बाद होत असताना. त्याने संघाचा पराभव वाचवला होता त्यामुळेच त्याच्या शतकाला महत्त्व होते. त्याच्या खेळीनंतर लाराने इंग्लंडमध्येच नाबाद 400 चा टप्पा पार केला होता. त्यावेळी समालोचन कक्षात किंग व्हिव्हियन रिचर्डस उपस्थित होते.
त्यांना एका पत्रकाराने विचारले की, लाराने सर गॅरी सोबर्सचा विक्रम मागे टाकला आहे. आता तो सोबर्सच्या पंक्तित आला का. यावर लारा अजून अल्विन कालीचरण यांच्याही पंक्तित आलेला नाही, सोबर्स तर फार पुढचा पल्ला आहे असे उत्तर रिचर्डस यांनी दिले होते. लाराने बरोबर 15 वर्षांपूर्वी ही नाबाद 400 धावांची खेळी केली होती. 350 पेक्षा जास्त धावा सोबर्स यांनी केल्या त्या लाराने मागे टाकल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडन याने सोबर्स व लारा यांना मागे टाकत एका कसोटीत 380 धावांची खेळी केली होती. ही कामगिरी कोण मागे टाकणार असे विचारणा करत असलेल्या जाणकारांना लाराने आपल्या बॅटने उत्तर दिले.
कसोटीमधील एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रम लाराच्या नावावर होता. पण ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेविरुद्ध 380 धावा करत लाराचा 375 धावांचा विक्रम मागे टाकला होता. इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात लाराने नाबाद 400 धावा फटकावताना हेडनची कामगिरी मागे टाकली व अविश्वसनीय विक्रम साकार केला. या खेळीत लराने 778 चेंडूत 43 चौकार आणि 4 षटकार मारले.