भाजीच्या आडून दारूची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

पुणे : पोलिसांना गुंगारा देत हातभट्टी दारूची वाहतूक करून विक्री करण्यासाठी दोघांनी नामी शक्कल लढविली. मात्र त्यांचा हा बनाव जास्त वेळ पोलिसांंच्या नजरेतून सुटू शकला नाही. लाॅकडाऊनच्या कालावधीत भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने घराबाहेर बाहेर पडून हातभट्टी दारूची वाहतूक करून विक्री करणाऱ्या दोघांच्या विरुद्ध दत्तावाडी पोलिस ठाण्यात कलम 188, 269, 270, 271 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविंद्र सखाराम पारदुले (42,), गितेश भरत खाणेकर (31,राहणार दोघेही जनता वसाहत) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रतिबंधात्मक आदेेशाच्या पार्श्वभूमीवर दत्तवाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ आपल्या पथकासह ल.रा. शिंदे चाैक लक्ष्मीनगर पर्वती येथे नाकाबंदी करत होते.
दरम्यान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वाहनांची तपासणी करत असताना दोन व्यक्ती एका दचाकीवरून येताना दिसल्या. त्यांना थांबवून बाहेर पडण्याचे कारण विचारले तेव्हा ते दोघांनी भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे बाहेर पडण्याचा परवाना आहे का याची विचारणा केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे समोर आले. मात्र दोघांच्याही हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांच्याकडील भाजीच्या पिशवीची तपासणी केली असता, मेथीच्या भाजीखाली गावठी दारूचे दडवलेले 20 फुगे मिळून आले.
दोघांकडे अधिक चाैकशी केली असता त्यांनी दारू विक्री करता आणली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक दुचाकी आणि मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.