पाकिस्तानच्या बासित अलीचा जावईशोध; आयपीएलवर ओढले ताशेरे
लाहोर – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) देखील त्यांच्या अधिकृत स्पर्धांपेक्षा इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) पैसा दिसतो, त्यामुळे येत्या काळात आयसीसी ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तसेच आशिया चषक स्पर्धा रद्द करु शकते किंवा पुढे ढकलू शकते, असा जावइशोध पाकिस्तानचा माजी कसोटीपटू बासित अली याने लावला आहे.
29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल करोनाच्या धोक्यामुळे 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली. त्यावेळी देखील करोनाचा धोका कायम असल्याने ही स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मात्र, ही स्पर्धा कधी व कुठे खेळविता येईल का याचे प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आजही सुरु आहेत फक्त त्याबाबत माध्यमांना सातत्याने अंधारात ठेवले जात आहे.
18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. तेथे 6 महिन्यांचा लॉकडाऊन लावण्यात आला असून 30 सप्टेंबरला त्याची मुदत संपत आहे. तसेच त्यापूर्वी आशिया चषक स्पर्धादेखील होणार आहे. करोनाचा धोका लक्षात घेता या स्पर्धा निश्चित वेळापत्रकानुसार होऊ शकत नाहीत असे स्पष्ट झाले तर त्या एकतर रद्दच होतील किंवा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या जातील. मग त्यावेळी जर सलग किमान 40 दिवसांची विंडो मिळाली तर बीसीसीआय आयपीएल खेळविण्याचा विचार करु शकते. मात्र, त्यासाठी त्यांना भारतात स्पर्धा घ्यायची का अन्यत्र ठिकाणी याबाबत निर्णय घ्यावा लागेल पण त्यासाठी त्यांना आयसीसी निश्चितच मदत करेल कारण त्यांनाही आयपीएलमधून मिळणारा पैसा जास्त महत्वाचा वाटतो, अशा शब्दात बासित अलीने आपले ज्ञान पाजळले आहे.
जागतिक क्रिकेटवर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या बिग थ्री देशांचे वर्चस्व आहे. त्यातही भारताकडून आयसीसीच्या एकूण महसुलाच्या 70 ते 80 टक्के वाटा जातो त्यामुळे आयसीसी कधीही बीसीसीआयला नाराज करु शकत नाही. आयपीएलसाठी ते आपल्या अधिकृत स्पर्धा देखील बाजूला ठेवतील, असा आरोपही बासित अलीने केला आहे.
म्हणूनच पाकची चिडचिड…
आयपीएलचे पहिले काही मोसम वगळता बीसीसीआयने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना पाकिस्तानी खेळाडूंची निवड करु नका असे स्पष्ट संकेत दिले व त्यानंतर आजवर एकाही संघाने पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतले नाही. अर्थात आयपीएल समितीनेही एकाही पाकिस्तानी खेळाडूचा समावेश लिलाव प्रक्रियेत तसेच थेट पातळीवर केलेला नाही, त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेत पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला खेळता येत नसल्यानेच बासित अलीसह त्यांचे अनेक खेळाडू आयपीएलबाबत टीकेचा सूर लावत असतात हेच अनेकदा स्पष्ट झालेले आहे. आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही पाकिस्तान क्रिकेट लीग (पीसीएल) सुरु केली मात्र, त्यातून म्हणावे तसे उत्पन्न त्यांना मिळालेले नाही तर दुसरीकडे आयपीएल खेळत असलेल्या एखाद्या नवोदीत खेळाडूलादेखील करोडो रुपयांचे करार मिळतात त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंची चिडचिड या अशा टीकेतून बाहेर पडते, असे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले आहे.