पुणे – सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिदवाक्य असणाऱ्या शहरवासीयांना करोनापासून वाचवण्यासाठी 24 तास रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलिसांपैकी तीन जणांना करोनाची बाधा झाली आहे. शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीला करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले,अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. नागरिकांना करोनाची लागण होऊ नये, या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळाव्यात, यासाठी प्रशासन दिवस-रात्र काम करत आहे. विशेषतः पोलीस प्रशासन रस्त्यावर उभे राहून या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी स्वतः जीव धोक्यात घालून काम करत आहे. फरासखानामधील कर्मचाऱ्याला बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्या संपर्कातील 14 जणांचे विलगीकरण करण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
संबंधित पोलीस कर्मचारी मागील काही दिवसात नेमके कोणाकोणाला भेटले याचा शोध घेण्यात येत असून त्यांच्या कुटुंबीयांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांचे आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम खबरदारीपूर्वक करण्यात येत आहे
– डॉ. के. व्यंकटेशम, पुणे पोलीस