करोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम रोखण्यासाठी निर्मला सीतारामन यांची उद्योग संघटनांशी चर्चा

नवी दिल्ली – कोविडच्या सध्याच्या लाटेचा देशाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम रोखण्यासाठी काय उपाययोजना करणे शक्‍य आहे, या बाबतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील विविध उद्योग संघटनांशी चर्चा करून त्यांच्याकडून प्रस्ताव आणि सूचना विचारून घेतल्या.

देशातील व्यावसायिकांकडूनही त्यांनी याविषयी फीडबॅक घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या महिन्यांत देशाचा जीडीपी उणे 23.9 टक्के इतका नीचांकी पातळीवर गेला होता. आता पुन्हा देशात कोविड लाट आली असून, अनेक राज्यांनी आपल्या हद्दीत वेगवेगळ्या मुदतीचे निर्बंध लागू केल्याच्या पार्श्‍वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी उद्योग व व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी व्यक्‍तिगतरित्या दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याकडून उपाययोजनांच्या संबंधात हा आढावा घेतला.

स्वतः निर्मला सीतारामन यांनी ट्‌विटरवर ही माहिती दिली. निर्मला सीतारामन यांनी ज्यांच्याशी चर्चा केली, त्यामध्ये सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक, फिक्कीचे अध्यक्ष उदय शंकर, असोचॅमचे अध्यक्ष विनीत आगरवाल यांचा समावेश होता. त्याखेरीज त्यांनी टाटा स्टीलचे प्रमुख टी. व्ही. नरेंद्रन, एल अँड टीचे अध्यक्ष ए. एम. नाईक, टीसीएसचे राजेश गोपिनाथन, मारुती सुझुकीचे आर. सी. भार्गव, वेणू श्रीनिवासन, हिरो ग्रुपचे पवन मुंजाल यांच्याशीही या उपाययोजनांच्या संबंधात माहिती घेतली. देशात यावेळी राष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन जाहीर केला जाण्याची शक्‍यता निर्मला सीतारामन यांनी कालच फेटाळून लावली होती.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसते, त्यामुळे आम्ही हा धोका पत्करू इच्छित नाही, असे त्यांनी म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.