गांधीनगर – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तसे स्वत: तर गुजरात वाऱ्या करत आहेतच, मात्र त्यांचे डेप्यूटी मनिष सिसोदिया आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा हेही मिशन गुजरातच्या मोडमध्ये आले आहेत. खस्ता झालेल्या कॉंग्रेसमुळे काहीशी शिथिल झालेल्या भारतीय जनता पार्टीला केजरीवालांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आव्हान निर्माण झाले होते. मात्र आता केजरीवालांच्या विरोधात जनतेच्या भावनांना हात घालणारा मुद्दा भाजपला मिळाला आहे. तोही केजरीवालांच्याच एक मंत्र्याने मिळवून दिला आहे. आता हा मुद्दा चालणार का याचे उत्तर निवडणुकीतच मिळेल.
केजरीवालांचे पोस्टर झळकले –
गुजतरातच्या काही भागात केजरीवाल यांचा फोटो असलेले पोस्टर झळकले आहेत. त्यात केजरीवाल यांनी मुस्लिम बांधव घालतात तशी टोपी डोक्यात घातली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, राम आणि कृष्ण यांना मी देव मानत नाही असे गुजराथी भाषेत पोस्टरवर लिहिले आहे. शुक्रवारी दिल्लीतील प्रकार व्हायरल झाल्यानंतर एका रात्रीत हे पोस्टर गुजरातमध्ये झळकले आहेत. तसेच हिंदू धर्मातील रिवाजांना केजरीवाल मानत नाही असे सांगणारेही पोस्टर त्यासोबत झळकले आहेत.
त्याला कारण ठरले आहेत केजरीवाल यांचे कॅबिनेट मंत्री गौतम. त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यात काही हिंदुंनी बौध्द धर्म स्विकारला. मात्र त्याचवेळी आम्ही राम आणि कृष्ण यांना देव मानत नाही अशी शपथही त्या कार्यक्रमात घेण्यात आली. आता तोच मुद्दा बनवून केजरीवालांच्या पक्षाला गुजरातमध्ये लक्ष्य केले जाणार हे उघड आहे. अहमदाबाद आणि राजकोट येथेही हे पोस्टर्स लागले आहेत व त्यात केजरीवालांची हिंदूविरोधी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
वडोदऱ्यात निदर्शने –
केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान वडोदऱ्यात तिरंगा रॅली घेणार होते. त्याचे पोस्टर येथे झळकले होते. मात्र त्यांच्या विरोधात निदर्शने करत आज हे पोस्टर रॅलीच्या अगोदरच फाडण्यात आले. दरम्यान, या प्रकारांतून भाजपची भीतीच दिसून येत आहे असा दावा आपचे नेते दुर्गेश पाठक यांनी केला आहे.