दिल्लीला नव्याने ऑक्‍सिजन पुरवठा

नवी दिल्ली – दिल्ली शहराला बुधवारी सकाळी काही प्रमाणात मेडिकल ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. दिल्लीतील काही मोठी सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांना हा ऑक्‍सिजन पुरवण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

दिल्लीत रोज सुमारे तीस हजाराच्या आसपास करोना रुग्ण आढळून येत असून त्या प्रमाणात दिल्लीत ऑक्‍सिजनचा तुटवडा प्रमाणात जाणवत आहे. ही बाब दिल्ली सरकारच्या वतीने केंद्राला कळवण्यात आली होती. गंगाराम रुग्णालयाला आज पहाटे तीन वाजता 5 हजार क्‍युबिक मीटर्स इतका ऑक्‍सिजन पुरवण्यात आला आहे. 

तथापि हा साठा केवळ बुधवारी दुपारपर्यंतच पुरा पडेल, असे रुग्णालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. गुरू तेंग बहादूर रुग्णालयालाही दीड वाजता ऑक्‍सिजन सिलिंडर्स पोहोचवण्यात आली आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयालाही मध्यरात्री तीन वाजता ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आंबेडकर हॉस्पिटललाही पहाटे पाच वाजता ऑक्‍सिजन पुरवठा करण्यात आला असून तो साठा 24 तास पुरेल इतकाच आहे. 

मंगळवारी दिल्लीत करोनाचे एकूण 28 हजार 395 रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत सध्या तीन इसमांच्या चाचण्या घेतल्या तर त्यातील एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. पॉझिटिव्हीटीचा हा रेट 32.82 टक्‍के इतका आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारला हात जोडून त्वरित ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. 

बुधवारी सकाळपर्यंत दिल्लीच्या रुग्णालयांना ऑक्‍सिजन मिळाला नाही तर दिल्लीत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे, असा इशारा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्‌विटरवर दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.