नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच राजधानी दिल्लीत कॉंग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या शीला दीक्षित मंत्रिमंडळात १५ वर्षे मंत्रिपद भूषविणारे राजकुमार चौहान ( Rajkumar Chauhan) यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. (former Delhi minister Rajkumar Chauhan resigns)
ते उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लोकसभेसाठी दावेदार होते. तिकिट न मिळाल्यामुळे ते निराश झाले होते. तसेच दिल्लीचे कॉंग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांच्या वर्तणुकीमुळे आपण निराश झालो असल्याचे खापर चौहान यांनी फोडले आहे. कॉंग्रेसने उत्तर पश्चिम दिल्लीतल दलित नेते उदित राज यांना उमेदवारी दिली आहे.
राजकुमार चौहान उदित राज यांच्या विरोधात चुकीची विधाने करत असल्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर कॉंग्रेसची एक बैठक झाली. त्यात चौहान यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान, विद्यार्थी संघटनेतून पुढे आलेले कन्हैय्या कुमार यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरूनही कॉंग्रेस पक्षात चांगली नाराजी आहे. गेल्याच आठवड्यात पक्षाच्या बैठकीत यावरून खडाजंगी झाली होती. संदीप दीक्षित यांनी कुमार यांना विरोध केला आहे. कन्हैय्या कुमार यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेसच्या अन्य उमेदवारांनाही फटका बसेल असा आरोप दीक्षित यांनी केला आहे. तसेच कॉंग्रेसने दिल्लीत आपशी केलेली हातमिळवणीही कॉंग्रेसजनांना फारशी रूचलेली नाही.