पुणे – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदा फक्त विद्यापीठ संकुलात आणि स्वायत्त महाविद्यालयातच राबवले जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात पुढील वर्षीपासून ते टप्प्याटप्याने राबविण्याचा निर्णय काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या कुलगुरू यांच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरूंची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे.
या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये “एनईपी’ अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी यावर सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व विषयांवर सकारात्मक धोरण ठरविले जाणार असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठांचे रॅंकिंग लवकरच जाहीर करू
केंद्र सरकारकडून देशातील सर्व उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठाची क्रमवारी जाहीर जाहीर केली जाते. आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रॅंकिंग जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.