वाराणसी: राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच आता विश्व हिंदू सेनेचा अध्यक्ष अरुण पाठक याने नारायण राणे विषयी पुन्हा एकदा सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधान केले आहे. पाठकने ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून अरुण पाठक फरार आहे. दरम्यान, अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे, पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत.
अरुण पाठकने ट्विटरवर लिहिले की, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठं केले आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत. राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला 51 लाखांचे बक्षीस दिले जाईल. तसेच, नारायण राणेंच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.
अरुण पाठकने 2020 मध्ये नेपाळी तरुणाचे मुंडन करुन जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी भेलूपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी अरुण पाठकने कॅन्ट, सिग्रा, लंका, दुर्गाकुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे वादग्रस्त पोस्टर्सही लावले होते. या प्रकरणी लंकेच्या भेलूपूरसह सिग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, पाठक सध्या फरार आहे.