आणखी 25 जणांच्या मृत्यूची नोंद
पुणे – हजारावर पोहचलेली करोना बाधितांची संख्या मागील चार दिवसांपासून आठशेपर्यंत कमी झाली. मंगळवारी दिवसभरात 750 बाधित सापडले आहेत.तर, अत्यवस्थ बाधित संख्या पाचशेच्या पुढे पोहचली आहे. दरम्यान, दिवसभरात करोनामुळे 25 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
शहरात मागील दोन दिवसांपासून रॅपिड ऍन्टिजेन टेस्टची संख्या दुपटीने वाढल्यामुळे दिवसभरात तब्बल 5 हजार 749 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3,820 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. तर 1 हजार 929 जणांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात आली.
सध्या डॉ. नायडू, ससून आणि खासगी रुग्णालयांत मिळून 9 हजार 409 बाधितांवार उपचार सुरू आहेत. त्यातील 513 जणांची प्रकृती चिंताजनक असून, तब्बल 198 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. मागील चार दिवसांत अत्यवस्थांची संख्या अधिक वाढली आहे. तर 315 बाधितांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बाधितांएवढेच डिस्चार्ज
आज (दि.14) दिवसभरात तब्बल 728 जण ठणठणीत बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्यांच्या संख्येनेही 18,824 चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दिवसभरात बाधितांइतक्याच व्यक्तींना घरी सोडल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.