जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी करोनाचा वाढता प्रकोप पाहता देशातील आपत्कालीन स्थिती आणखी 15 दिवस वाढविण्याची घोषणा केली आहे. रामाफोसा यांनी रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत दररोज कर्फ्यू लागू असल्याचीही घोषणा केली आहे.
त्याचबरोबर दारूविक्री बंदची घोषणा केली आहे. तसेच दारू वितरण करण्यावरही निर्बंध घातले आहे. लोक दारू पिण्यासाठी एकत्र येत असल्यामुळे करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यामुळे ही दारूबंदी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नातेवाईकांच्या भेटीगाठींवरही निर्बंध घालण्यात आले आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अंमलात असलेली 5 स्तरीय रणनीती योजनेत कोणतेही बदल न करता सध्याच्या तिसऱ्या स्तरावरच योजना ठेवली आहे.
रामाफोसा यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत सध्या करोनाबाधितांची संख्या 2 लाख 76 हजार 500 पेक्षा अधिक आहे, तर 4 हजार 79 पेक्षा जास्त लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील एक चतुर्थांश संख्या मागील आठवड्यातील आहे. राष्ट्रपतींनी सांगितले की, रोज 12 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. अनेक लोक मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेक लोक लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करत असल्याकडेही त्यांनी अंगुलीनिर्देश केला आहे.
राष्ट्रपतींनी म्हटले की, अनेक लोक पार्टी करत आहेत, दारू पीत आहेत आणि मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. अंत्यविधीसाठी 50 लोकांना अनुमती असताना एक हजार लोक जमा होत आहेत. यामुळे करोना विषाणू संसर्ग वेगाने पसरत आहे. यावर अटकाव घालण्यासाठी दारूबंदी हा उपाय केलेला आहे.