पिंपरी – पिंपरी चिंचवड अपर तहसिल कार्यालयांतर्गत नवीन २२ तलाठी (सजा) कार्यालयांची निर्मीती झाली असून आता एकूण ३१ तलाठी कार्यालयांची संख्या झाली आहे. मात्र, नवीन सजासाठी कार्यालये व तलाठी नसल्याने मुळ तलाठी व मुळ जागेवरुनच कामकाज सुरु आहे. शहरातील उपनगरांमध्ये असलेल्या नवीन तलाठी कार्यालयांसाठी महापालिकेकडे जागेची मागणी अपर तहसिल कार्यालयाकडून करण्यात आली आहे.
नागरिकांना आपल्या गावात महसूल विषयक कामे करता यावीत, यासाठी तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्ह्यात गाव तेथे तलाठी कार्यालय निर्माण करण्यासाठी २०१८ साली अंतिम अधिसुचना काढली होती. मात्र, या अधिसुचनेची अंमलबजावणी होण्यास आठ वर्षे लागले. एक महिन्यापुर्वी नवीन मंडळ कार्यालय व तलाठी नवीन कार्यालयांचे कामकाज सुरु झाले आहे. मात्र, मुळ तलाठी कार्यालयातूनच हे काम त्याच तलाठ्यांना अतिरिक्त पदभार देऊन केले जात आहे.
अशी असेल नवीन तलाठी रचना
मंडळ कार्यालय – तलाठी (सजा)
चिंचवड – चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, रहाटणी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर
निगडी (नवीन) – निगडी, किन्हई, चिंचोली, रावेत, मामुर्डी, किवळे
देहू (नवीन) – देहू, माळीनगर, विठ्ठलनगर, चिखली, बोऱ्हाडेवाडी, तळवडे
भोसरी – भोसरी १, भोसरी २, दोपोडी, पिंपळे निलख, सांगवी, दिघी, बोपखेल
मोशी (नवीन) – मोशी, डुडूळगाव, चऱ्होली बु., निरगुडी, चोविसावाडी, वडमुखवाडी
महापालिकेकडे जागेची मागणी
नवीन तलाठी कार्यालयांचे शासकीय दप्तर वेगळे करण्यात आले आहे. मात्र, मुळ तलाठी कार्यालयातून कामकाज सुरु असल्याने लोकांचे हलपाटे काही कमी झालेले नाहीत. शहरातील उपनगरमध्ये निर्माण झालेल्या तलाठी कार्यालयासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे हवेली व आसपासच्या परिसरातील नागरिकांना समाधानकारक सेवा देणे शक्य नसल्याने २०१३ साली पिंपरी चिंचवड अप्पर तहसिलदार कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. या कार्यालयाची स्थापना झाल्याने शहर व उपनगरातील नागरिकांची चांगली सोय झाली होती. चिंचवड, भोसरी व मोशी मंडळ, १३ सजे व त्यामध्ये ३० गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यात पिंपरी चिंचवड शहर व ५ ग्रामीण गावांचा सहभाग होता. त्यावेळी मोशी मंडळ प्रस्तावित होते. मात्र, २० वर्षानंतर हा विभाग अस्तित्वात आला आहे.
सध्या नऊ तलाठी, मुळ व नवीन तलाठी कार्यालयांचे अतिरिक्त कामकाज पाहत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेकडे कार्यालयांच्या जागेसाठी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून तलाठ्यांची नियुक्ती झालेली नाही. मात्र, मुळ तलाठ्यांना अतिरिक्त पदभार दिल्याने नागरिकांची गैरसोय होत नाही.
– डॉ. अर्चना निकम, अपर तहसीलदार, पिंपरी चिंचवड.