केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टतर्फे औषध विक्रेत्यांची साखळी
पिंपरी – करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अत्यावश्यक औषधे घरपोच देण्याची सेवा केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्टच्या वतीने सध्या राबविण्यात येत आहे. या सेवेसाठी असोसिएशनतर्फे औषध विक्रेत्यांची विभागनिहाय साखळी तयार केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना औषध, भाजीपाला, दूध आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडावे लागत आहे. औषध खरेदीसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून केमिस्ट असोसिएशनच्या वतीने नागरिकांना घरपोच औषधे दिली जात आहेत. घरपोच औषध सेवेसाठी सहा विभाग तयार केले आहेत. प्रत्येक विभागात काही औषध विक्रेत्यांचा समावेश केलेला आहे.
पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी या विभागासाठी चार औषध विक्रेत्यांची साखळी आहे. चिंचवड-वाकड-थेरगाव या विभागासाठी 6 औषध विक्रेते घरपोच सेवा देत आहेत. भोसरी-मोशी विभागासाठी 5 औषध विक्रेत्यांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आकुर्डी-निगडी विभागासाठी 4 औषधे विक्रेत्यांकडून सेवा पुरविण्यात येत आहे. त्रिवेणीनगर-रुपीनगर-यमुनानगर-चिखली भागासाठी 6 औषध विक्रेत्यांची साखळी करण्यात आली आहे. तर, सांगवी-दापोडी भागासाठी 3 औषधे विक्रेत्यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे.
औषधांची घरपोच सेवा घेण्यासाठी नागरिकांना विभागनिहाय दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर दररोज सायंकाळी सहापर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठविणे बंधनकारक आहे. दुसऱ्या दिवशी औषधे घरपोच केली जात आहेत. ही घरपोच औषध सेवा लॉकडाऊनच्या कालावधीतच कार्यरत राहणार आहे.
याबाबत आधिक माहितीसाठी संपर्क : केमिस्ट असोसिएशन संघटक सचिव रवी पवार : 9850275824, तुषार तावरे : 7020037313.
देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी विभागनिहाय अत्यावश्यक औषधे घरपोच देण्याची सुविधा सुरू केलेली आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन असलेली औषधेच या सुविधेमध्ये दिली जात आहेत. त्यासाठी औषध विक्रेत्यांची साखळी तयार केलेली आहे.
– तुषार तावरे, केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट.