पुणे – लॉकडाउनमुळे भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी झुंबड उडत आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या सहकार्याने घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. घराशेजारीच आठवडेबाजारांना त्यांनी परवानगी दिली आहे.
हे आठवडे बाजार भरवले जाणार असले, तरी नियमांच्या अधीन राहून नागरिकांना येथे खरेदी करता येणार आहे. सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना भाजीपाला घरपोच किंवा घराजवळ उपलब्ध होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय भाजीपाला मिळण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी भाजीपाल्याची मागणी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील महापालिकेने नेमलेल्या शेतकरी संयोजकांकडे मोबाइलद्वारे संपर्क करून दिल्यास योग्य तो मोबदला आकारून संबंधित शेतकरी संयोजकांकडून तो घरपोच किंवा घराजवळ पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध करण्यात येणार असल्याचा दावा करत मालाचा दर्जा, दराबाबत आणि गुणवत्तेची जबाबदारी राहणार नाही, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.