राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष काकडे भाजपमध्ये

वाघोली – महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ काकडे यांनी ऊरूळी कांचन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून काकडे यांनी वेगळेपण सिद्ध केले होते. थेऊर गावच्या सरपंचपदाचा मान मिळाल्यानंतर राज्यातील सरपंचांचे प्रश्‍न मांडण्यासाठी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काकडे यांनी कामकाज केले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात पवार यांनी आज अखेरपर्यंत हजेरी लावली होती.

सध्या हवेलीमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याची संख्या वाढू लागली आहे. त्यात काकडे यांच्या प्रवेशाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठी हानी पोचण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
काकडे यांच्या प्रवेशावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल, कांचन कुल, शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे व तालुक्‍यातील बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.